महाराष्ट्रात बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करत असतात.परंतू तुरीला मिळणाऱ्या कमी दर व नैसर्गिक आपत्तीमुळे मुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. गेल्यावर्षी बीडमधील पांढऱ्या तुरीला चांगला दर मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. आता पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी वाढली आहे. त्यामुळे चांगला दर मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
तूर उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या बदलाचा नेहमीच फटका बसतो. त्यात दर चांगला मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, आता तुरीला परराज्यातून मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला दर मिळत असून आर्थिक फायदा होत आहे.
परराज्यांतून मागणी
गेल्या वर्षी बीडमधील पांढऱ्या तुरीला गुजरातमधून सुरत, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात मागणी होती. यंदा देखील बाजार समितीमध्ये तुरीची आवक सुरू झाल्यानंतर परराज्यातून मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषत: छत्तीसगड या राज्यातून तुरीसाठी अधिकची मागणी आली आहे. त्यामुळे पांढऱ्या तुरीला 5 ते 7 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून, आतापर्यंत जवळपास ४ हजार क्विंटल तूर छत्तीसगड राज्यात पोहोचली आहे.
बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (Beed APMC) आवारात पांढऱ्या तुरीची आवक सूरू झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून 6 हजार क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक झाली आहे. मागील दोन आठवड्यात चार ते पाच हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. बीडमध्ये थंडी आणि धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु, आता ही आवक सुरळीत झाली असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.
