महाराष्ट्र (Maharashtra): राज्यातील बहुतांश भागात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून,त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या तापमानात वाढ झाल्याने उष्णतेची लाट आली असून, त्याचा परिणाम फळबागांवर होत आहे.
शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली असून शेकऱ्यांना आता पुन्हा चिंता लागून राहीली आहे.अगोदरच अवकाळी पावसामुळे फळबागांच प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे आता उन्हाचा पारा वाढत चाललाय आणि याचाच परिणाम फळबागांवर होताना दिसतोय. त्यामुळे या वातावरण बदलांचा परिणाम फळबागांवरही होत असल्याचं पहायला मिळत आहे.
मोसंबीच्या पिकाला उष्णतेचा फटका…
यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबीचा बहार धरला होता. मात्र अचानक उन्हाची तीव्रता वाढू लागली. त्यामुळे विहिरीतलं पाणी आटू लागलं. लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या भागात वाढत्या उष्णतेमुळे परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे रेशीम कोष तयार करणाऱ्या रेशीम आळीवर देखील परिणाम होऊ लागला आहे. रेशीम कोष तयार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर लावावे लागत आहेत.. नाहीतर त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अवकाळी पाऊस यापूर्वी फेब्रुवारी मार्चमध्ये पडायचा आता मात्र एप्रिलमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे फळबागाचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढल्याने तलावातल्या पाण्याची पातळी कमी झाली. विहिरी देखील कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम आता फळबागांवर जाणवू लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवसंकट उभा राहिल आहे.