अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून रब्बी पिके, फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. आता शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळ्याने दार ठोठावले आहे. उत्तर भारतातील काही भागात पारा 30 ते 35 अंशांच्या आसपास नोंदवला जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ३८ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शेतकरी रबी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी काढण्याच्या लगबगीत असतानाच गारपिटीसह मेघगर्जना व वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता ग्रामीण कृषी मौसम सेवेकडून वर्तविण्यात आली होती. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात गारपिटीने कहर केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात तिसऱ्या दिवशीही वादळी वारा आणि पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.आता शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची याचना केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी, खासदार, आणि त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांनी बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.
जिल्ह्यात यलो (Yellow) अलर्ट जारी
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी 19 मार्च 2023 साठी यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊ शकतो. या दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मुखेड तालुक्यातील बरळी आणि मुकर्माबाद भागात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे.18 मार्च रोजीही दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेली गारपीट रात्री उशिरापर्यंत सुरू होती.