कंद पिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. रताळे, सुरण सारख्या कंद पिकाला नवी मुंबईतील वाशी मार्केट मध्ये मोठी मागणी आहे. कंद पिकांनाआयुर्वेदातही मोठं स्थान आहे. कंद पिकांची निर्यात देखील केली जाते.
महाराष्ट्रातील शेतकरी धान्य व बागायती शेती बरोबरच आता कंद पिकाच्या लागवडीकडे वळला आहे. शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पादन मिळू शकतं. कोकणातील काही शेतकऱ्यांनी कमीत कमी क्षेत्रावर हा कंदपीक लागवड ग्रामबिजोत्पादन प्रयोग राबवून यशस्वी केला आहे. कमीत कमी जागेत चांगले उत्पन्न घेता येतं व कंद पिकांच्या बियाण्यांची विक्री ही उत्तम प्रकारे होऊ शकते हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. हा प्रयोग कोकणामध्ये दापोली व खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये यशस्वी झाला आहे. केवळ दोन गुंठे जागेत जवळपास ३३५ किलो उत्पन्न मिळालं आहे. यासाठी सुरण या कंदपिकाची लागवड करण्यात आली होती.
महाराष्ट्रात सतत होत असलेल्या हवामान बदलामुळं आता पीक पद्धती बदलण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना कंद पिके घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकेल, असे मत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांनी व्यक्त केलं आहे. कोकणात खरिप हंगामात कमीत कमी जागेत फार कोणतीही मेहनत न घेता कंद पीक उत्तमरित्या येऊ शकतं हे आता स्पष्ट झालं आहे. कोकणात खरिप हंगामात भातशेती केली जाते याला मेहनत व मनुष्यबळही त्याला खूप लागतं तसेच काळजीही घ्यावी लागते. या सगळ्याला आता कंद पिकाची लागवड हा एक भविष्यात उत्तम पर्याय ठरू शकेल हेच या प्रयोगातून स्पष्ट झालं आहे.
शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेऊन कंदपिकांची बियाणे विक्री केली आहे. एक ते तीन गुंठ्यांमध्ये ही लागवड त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या कंद पिकाच्या लागवडीनंतर कोणतीही फवारणी अथवा कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच किलोमागे जवळपास ७० ते ८० रुपये किलो इतका दर हे मिळतो.
कोकणात पिकाच्या लागवडीसाठी पोषक असे वातावरण आहे. विद्यापीठाअंतर्गत चालू असलेल्या अखिल भारतीय समन्वित कंदपिके योजनेमध्ये कोकणात होणाऱ्या विविध कंदपिकांवर संशोधन चालू आहे. या प्रकल्पाच्या संशोधनातून कणघर, रताळी, अळू, पोरकंद आदी कंद पिकाच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. तसेच विविध पिकांच्या लागवड पध्दती प्रमाणित करून त्याचीही शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाचा या पिकाच्या वाढीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही, असं या संशोधनाअंती नोंदवण्यात आलं आहे. इतर पिकांच्या तुलनेने कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याने सध्या शेतकरीवर्ग कंदपिकाच्या लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे कंद पिकाच्या लागवडीसाठी कट/ रोपे / खोड याची मागणी आता वाढत आहे.
शेतकऱ्यांच्या या वाढत्या मागणीप्रमाणे त्यांना लागवडीसाठी आवश्यक कंदांचा किंवा रोपांचा पुरवठा करण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेणे आवश्यक होते. याकरीता विद्यापीठ प्रक्षेत्रावर बिजोत्पादनाच्या मर्यादा लक्षात घेता गतवर्षीच्या संशोधन समितीच्या बैठकीमध्ये यावर उपाययोजना सुचविण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे.